Comic Inauguration

अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट & मीडियाची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘टिमॉय- द टायगर बॉय’ आणि ‘आदीचा समुद्रातील थरार’ या पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध गायक आणि बालकलाकार पद्मनाभ गायकवाड याच्या हस्ते झाले.

    पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमास चित्रकार रतन बागूल, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. आर. सांगलीकर, संचालिका अपर्णा सांगलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पद्मनाभ म्हणाला, ‘दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत मी गावातल्या माझ्या मित्रांसोबत भरपूर खेळतो. आता या सुट्टीत माझ्यासोबत टिमॉय, आदी, मिनू, तारा असे कितीतरी नवीन मित्र असणार आहेत. ही पुस्तके वाचल्यावर मला खरं तर टिमॉय आणि आदीचा हेवा वाटला, कारण ग्रामीण, शहरी जीवनाचा मी आजवर मनसोक्त आनंद लुटलाय, पण त्यांच्यासारखं जंगलातलं, खोल समुद्रातलं जीवन जगायला मला कधी मिळणार?’

    सी. आर. सांगलीकर म्हणाले, ‘या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना मनोरंजनाची मेजवानी मिळावी, त्यांच्या कल्पनाविश्वामध्ये आपल्यालाही डोकावता यावं म्हणून या पुस्तकांचं प्रकाशन आम्ही केलं आहे. छोटा भीम फेम सोनम शेखावत यांनी याचं लेखन केलं असून रतन बागूल यांनी रेखाटनं केली आहेत. ही दोन्हीही पुस्तके मराठी, हिन्दी आणि इंग्रजी अशा तीन भाषेत बाजारात उपलब्ध करून देत आहोत.’

    या प्रसंगी उपस्थितांची फर्माईश पुरी करताना पद्मनाभ याने ‘एक थी डायन’ या सिनेमासाठी गायलेलं गुलजार यांचं‘सपना रे सपना’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.